हा असा चंद्र
हा असा चंद्र.. अशी रात फिरायासाठी !तूच नाहीस इथे हात धरायासाठी !
चेहरा तो न इथे ही न फुलांची वस्ती !
राहिले कोण आता सांग झुरायासाठी?
कालचे तेच फिके रंग नकोसे झाले
दे तुझे ओठ नवा रंग भरायासाठी !
आडवी एक तिथे भिंत मनाची आली..
दार होतेच कुठे आत शिरायासाठी?
काय आगीत कधी आग जळाली होती?
लोक नेतील मला खोल पुरायासाठी !
0 टिप्पण्या