||बोधकथा-१||
(स्वतःचे आचरण चांगले ठेवा,तेव्हाच दुसर्याला उपदेश करा .)
स्वातंत्र्यपूर्व काळातील ही गोष्ट आहे. सन 1920 साली राजकीय क्षितिजावर महात्मा गांधीजी यांचा उदय झाला. सर्वत्र गांधीजींचे विचार भारतीय जनता मानू लागले. गांधीजी सांगतील तसेच लोक वागू लागले. बऱ्याच लोकांना महात्माजींनी अनेक व्यसनापासून व्यसनमुक्त केले. अशाच एका मुलाची कथा आज मी आपणास सांगणार आहे. रोशन नावाचा एक मुलगा होता. त्याचे वय लगबग वीस- एकवीस वर्षाचे होते. परंतु मित्रांच्या संगतीमुळे त्याला गुळखाण्याचे व्यसन लागले. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच. तो लहान असतांना त्याच्या वडिलांचे निधन झाले होते.त्यांला मार्गदर्शन करणारे असे कोणीच नव्हते.या विचाराने त्याची आई खूप चिंतित असायची. अशातच रोशन च्या आईला गांधीजी बद्दल समजले आणि त्यांनी रोशनला गांधीजी कडे घेऊन जायचे ठरवले. असेच एका दिवशी रोशन आणि रोशन ची आई गांधीजीच्या आश्रमामध्ये गेले. गांधीजींना नमन करून त्यांच्या समोर बसले. रोशन च्या आईने गांधीजींना रोशनच्या गुुळ खाण्याबद्दल सांगितले.
यावर गांधीजींनी थोडा विचार केला आणि त्यांना पंधरा दिवसांनी परत येण्यास सांगितले.रोशनच्या आईला गांधीजींचे हे उत्तर फारसे पटले नाही. परंतु त्या गांधीजींना काहीही न बोलता त्या ठिकाणाहून परत आपल्या घरी आल्या.त्यांना गांधीजींचा मनातल्या मनात रागही आला होत. परंतु पंधरा दिवसानंतर गांधीजी नेमके रोशनला काय सांगतील. या विचाराने त्यांनी पंधरा दिवसांनी परत रोशनला गांधीजी कडे घेऊन गेल्या आणि गांधीजी समोर बसून त्यांनी रोशन बद्दल परत गांधीजींना सांगितले. गांधीजी शांतपणे रोशन कडे पाहिले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला म्हणाले बाळ गुळ खाऊ नये. जास्त गुळ खाणे आरोग्यास घातक असते आणि ते शांत बसले. यावर रोशन ची आई गांधीजींना म्हणाली, "तुम्हाला जर एवढेच सांगायचे होते तर आम्ही पंधरा दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेस का नाही सांगितले?" यावर गांधीजी शांतपणे म्हणाले, त्यावेळेस मी स्वतः गूळ खात होतो आणि मलासुद्धा गुळ खाण्याचे व्यसन जडलेले होते. त्यामुळे मलाच व्यसन असल्याने मी रोशनला गुळ खाऊ नकोस असा उपदेश करू शकत नव्हतो. म्हणून मी सर्वप्रथम पंधरा दिवसांमध्ये माझी गूळ खाण्याची सवय सोडली आणि नंतरच रोशनला गुळ खाऊ नकोस असा उपदेश केला. रोशन आणि रोशन च्या आईने महात्माजींना नमन केले आणि त्यांच्या घराकडे परत निघाले.
0 टिप्पण्या