🍀 देवमाणूस...🍀
महात्मा फुले
🌱 १८५१ साल उजाडले .महार , मांग , चांभार आदी अस्पृश्य मानलेल्या बांधवांसाठी पहिले ज्ञान मंदिर उघडण्याचे ज्योतीबांनी जाहीर केले .गावभर बातमी पसरली . मोरशास्त्री चेकाटले , ‘ ज्यांना शिवले तर अधर्म होतो ,त्यांच्यासाठी शाळा..?" नीच जातीतल्या लोकांना शिक्षण भ्रष्टाचार भ्रष्टाचार.." कोंडभट आश्चर्यचकित होऊन बोलू लागले." अहो, तो ज्योतिबा ख्रिस्ती होणार आणि शिकलेल्यानाही बाप्तिस्मा देणार...याला गावाबाहेर हाकलले पाहिजे.." धोंडभट आवाज चढवून म्हणाले. " मुलींच्या शाळा काढल्या आणि नीतीची व धर्माची राख रांगोळी केली.पुढे बायका पुरुषांच्या डोक्यावर मिरी वाटतील. महारमांग शिकले तर उद्या रस्ते कोणी झाडणार नाहीत.मेलेल्या गुरांची मढी ओढणार नाहीत. मोर्या – गटारे धुणार नाही. भंगी शिकले तर मैल्याच्या पाट्या डोक्यावर घेणार कोण ? महार, मांग, भंगी शेफारतील . काहीतरी बंदोबस्त झालाच पाहिजे. आता तर महारमांगांची शाळा काढून फुल्याने कहर केला आहे.."नारभटाने पाढा वाचला...
भिकंभटाने नारभटाची री ओढली. " अहो, जरा युक्तीने निकालच लावा की याचा.." शाम भट तणतणून म्हणाले चार चौघांचे टोळके जमले .खल झाला.काहीतरी कट शिजला.ज्योतीबांचे घर म्हणजे आनाथ मुलांचा आसरा . ज्यांना आईबाप नव्हते , मायेचे माणूस नव्हते, अशा टाकलेल्या, सोडलेल्या मुलांचे आईबाप सावित्री बाई आणि ज्योतिबा.अनेक मुलांचा सांभाळ ते करीत.मध्यरात्र उलटून गेली होती.सगळी मुले गाढ झोपली होती.मध्येच एक बाळ चुळबुळले , रडू लागले. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून ज्योतीबांना जाग आली.ते उठले. पाळण्याजवळ गेले.त्या मुलाला उचलून घेतले.त्याला थोपटून खांद्यावर निजवू लागले.त्या वेळी दोन मारेकरी दबकत दबकत येऊन दारा आड लपले होते.एकाचे नाव धोंडीराम आणि दुस-याचे रोडे .रामोशी जातीचे . त्यांच्या हातात पाजललेल्या फरशा होत्या. त्यांना ज्योतीबांना जीवे मारावयाचे होते. ते दारा आड उभे होते .इतक्यात वारा आला.दार उघडले जाऊन करकर आवाज झाला. ज्योतीबांनी दाराकडे पाहिले तेव्हा त्यांना मारेकर्यांची छाया भिंतीवर पडलेली दिसली. “ कोण..? कोण आहात तुम्ही..? काय पाहिजे तुम्हाला..? ” ज्योतीबांनी विचारले... त्या बरोबर ते मारेकरी आत शिरले...
धोंडीराम म्हणाला..
" आम्ही तुमचा खून करण्यासाठी आलो आहोत. " ज्योतिबा म्हणाले...
का बरे...?
माझं काही चुकलं काय..?
मी कोणाचे नुकसान केले आहे काय..?
पण उत्तर आले नाही. ज्योतीबांनी पुन्हा विचारले,
“ बोला, घाबरू नका...
कोणत्या कारणाने तुम्ही असे करण्याचा निर्णय घेतला...? ”
रोडे म्हणाला...
" तुमचा खून केल्यावर एकेक हजार रुपये मिळणार आहेत आम्हाला..."
“ ठिक आहे. मला मारण्याने आपला फायदा होत असेल तर माझी मान मी आपल्या पुढे तुकवितो. पण माझी एक शेवटची नम्र विनंती आहे.मी गेल्यावर या अनाथ बालकांचे लालन पालन तुम्ही करा.त्यांना शाळेत घाला. त्यांना शिकवा. त्यांच्यावर प्रेम करा. ”
दिव्याची वाट मोठी करीत ज्योतिबा म्हणाले.
वात पुढे सारताच त्या खोलीत लख्ख उजेड पडला.
धोंडीराम व रोडे यांनी खोलीत निजलेल्या बालकांकडे पाहिले...
“ अरे हा तर झख्या महाराचा पोरगा दिसतो.
या पोराचा बाप मागल्या वर्षीच देवाच्या घरी गेला.
आणि हा कोण..?
हा तर शिद्या चांभाराचा गण्या झोपलाय लेकाचा.
आणि हा बन्या. न-याभाऊंच्या रंडक्या पोरीचा पोरगा.”
त्यांनी सगळ्या बालकांकडे पाहिले.
ती निष्पाप, निरागस वृत्तीची अनाथ बालके महार-मांगवाड्यातीलच होती. आपल्याच जातीतल्या, नात्यागोत्यातल्या अनाथ ,चिमण्या बालकांचे लालन–पालन ज्योतिबा करीत आहेत हे त्यांना कळून चुकले. त्यांना त्या झोपडीत मूर्तिमंत वात्सल्याचे मंगल दर्शन झाले . त्यांचे मन द्रवले. अंत:करण गदगदलं. हातातील फरश्या नकळत खाली गळून पडल्या . धोंडीरामने एकदम ज्योतीबांच्या पायांना मिठी मारली आणि त्यांच्या पावलांवर आसवे ढाळीत तो सदगदित होऊन म्हणाला , “ तात्या साहेब क्षमा करा आम्हाला... अविचाराने आमच्याकडून मोठे पाप घडले असते आज.. तुम्ही खरोखर देवमाणूस आहात. अनाथांचे नाथ आहात.."दुस-या मारेक-यानेही ज्योतीबांच्या पावलांवर लोटांगण घातले . ज्योतिबा थोर संतच. त्यांनी दोघांना जवळ घेतले आलिंगन दिले. त्या दोघांच्या डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागल्या. त्यांचे मन साफ धुतले गेले. पवित्र झाले. पुढे दोघांनाही ज्योतीबांनी आपल्या रात्रीच्या प्रौढ शिक्षण शाळेत दाखल करून घेतले. शिकून ते मार्गाला लागले. पुढे रामोशी रोडे ज्योतीबांचा संरक्षक झाला. धोंडीरामाला त्यांनी शिक्षणासाठी काशीला पाठविले. धोंडिराम नामदेव कुंभार हा शिकून महापंडित बनला . त्याने ‘ वेदाचार ’ हा ग्रंथ लिहिला. सत्यशोधक समाजाचा तो आधार स्तम्भ बनतो।
दृष्टांनी रचलेला खुनाचा डाव हुकला।
त्यांची पूर्ण फजीती झाली।
महात्मा फुलेंचे कार्य सतत चालूच राहिले।।
0 टिप्पण्या